भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील बैलपोळा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे पोळा सण साजरा करता आला नाही. यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला.
वराडसिम येथील पोळ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
या गावाच्या दरवाजाच्या खिडकीतून बैल उधळून पोळा फोडण्याची 200 वर्षाची परंपरा आजही पाळली जात आहे. त्यामुळे वराडसिम येथील पोळ्याला महत्व प्राप्त झालेले आहे. पोळ्यानिमित्त सजवलेल्या बैलांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर गाव दरवाजाला असलेल्या अडीच बाय तीन फूट आकाराच्या लहानशा खिडकीतून बैल कुदवुन पोळा फोडला जातो. हा थरार क्षण पाहताना अंगावर काटा उभा राहतो. यावर्षी जोगलखोरी गावातील गजानन सुरेश पाटील यांच्या बैलाने अडीच बाय तीन फुट खिडकीतून उडी घेऊन बैलपोळ्याचा मान मिळविला आहे.
तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या हस्ते गजानन पाटील यांना शाल व श्री-फळ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामपंचायत सरपंच भारतीय विनोद पचरवाल, उपसरपंच ज्योसना विलास पाटील, पोलीस पाटील सचिन वायकोळे , तंटामुक्तीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी सरपंच विलास पाटील, विनोद पत्रवाल, प्रतिभा जंगले, राजू जोशी, माजी उपसरपंच प्रीती ढाके, देविदास नाईक, महेंद्र सपकाळे, संजय ढाके, गणेश सपकाळे, भास्कर सोनार, निवृत्ती मावळे, नाना झारखंडे, माजी सरपंच कैलास कोल्हे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.