
Akash Dhake, Khabar 24 Express | भुसावळ : 1960 पूर्वी अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट असलेल्या धोबी-परिट समाजाला पुन्हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसह एक सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच भुसावळ तालुक्याचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांतील धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये होता आणि त्या काळी त्यांना सर्व शासकीय सवलती मिळत होत्या. मात्र, 1960 मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर या जिल्ह्यांचा महाराष्ट्रात समावेश झाला आणि त्यानंतर धोबी समाजाला ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले. यामुळे समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
महत्त्वाचे मुद्दे व शिफारसी :
भूतपूर्व समावेशाचा पुरावा :
धोबी समाजाचा अनुसूचित जातीतील समावेश 1936, 1941, 1955 आणि 1958 च्या यादीत असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. तसेच 1948 मध्येही हा समाज अनुसूचित जातीचा भाग होता.
डॉ. डी. एम. भांडे समितीचा अहवाल (2001) :
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या या समितीने स्पष्ट शिफारस केली आहे की धोबी समाज अनुसूचित जातीचे सर्व निकष पूर्ण करतो आणि त्याला तात्काळ त्या प्रवर्गात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाची शिफारस (2019) :
आयोगानेही धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत शासनाला स्पष्ट शिफारस केली आहे.
बार्टीचा अभ्यास अहवाल :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने देखील धोबी/परिट समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याची शिफारस केली आहे. बार्टीच्या मते, हा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) चा आधार :
1978 च्या अहवालात TISS ने धोबी समाजाला अपृश्य व आरक्षणास पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच शासनाने ‘श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ’ हे धोबी-परिट समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यान्वित करावे आणि या महामंडळाला आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
या वेळी कैलास शेलोडे (जिल्हाध्यक्ष), रमेश नारे (संस्था अध्यक्ष), गोपाळ बाविस्कार (नि. सनीव), बाळू शेलोडे (जि. सघटक), नरेंद्र वाघ (ता. अध्यक्ष), तुळशीदास देवबेकर, वामन सपकाळे, अनिकेत वाघ, रविंद्र वाघळे, ज्ञानेश्वर कमचक, किसन बावीस्कर, बंडू सपकाळे, राहुल रोकडे, संतोष शेलोडे, आनंदा सुरडकर, माधव बोरसे आदी समाज बांधव उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7