मुंबई दि. 25 – माझ्या जल्माची चित्तरकथा या प्रसिद्ध आत्मचरित्राच्या लेखिका;पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार लेखिका ;शिक्षिका; मातोश्री शांताबाई कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत शांताबाई कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुण्यात त्यांची मुलगी मंगल ( गौरी) तिरमारे यांच्या निवासस्थानी मातोश्री शांताबाई कांबळे यांचे आज वयाच्या 101 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 8 वाजता नवी मुंबई कोपरखैरणे येथील स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यावेळी ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत शांताबाई कांबळे या अत्यन्त गरिबीतून पुढे येऊन शिक्षिका झाल्या. सांगली जिल्ह्यात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांचे पुत्र दिवंगत अरुण कांबळे भारतीय दलित पँथर चे अध्यक्ष होते.त्यांचा मुलगा चंद्रकांत कांबळे हे मुख्याध्यापक होऊन निवृत्त झाले आहेत.दिवंगत मातोश्री शांताबाई कांबळे यांच्याशी पुत्रवत नाते राहिले आहे. आमचे त्यांच्याशी घरोब्याचे नाते होते. त्यांनी माझा विवाह जुळविण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या करगणी या गावाशी माझे जवळचे संबंध राहिले आहेत. दिवंगत मातोश्री शांताबाई कांबळे या आजारी असताना आम्ही अनेकदा त्यांना सहकुटुंब भेटलो होतो.त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित नाजूका ही मालिका दूरदर्शनवर लोकप्रिय झाली होती. मातोश्री शांताबाई कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील माझ्या सारख्या कार्यकर्त्यांचे मातृछत्र हरपले आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
ब्यूरो रिपोर्ट :- सचिन झिटे, मुंबई