भुसावळ येथील निखील राजपूत याच्या मर्डर नंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोवर भुसावळात पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे, शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोवर आज पुन्हा शहरात खून झाला आहे.
शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह-हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले.
मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात काळीज पिळवटून काढणारा शोक व्यक्त केला. या संदर्भात प्रतिनिधीने वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाजीर शेख नशीर यांच्या मृत्यूला दुजोरा दिला.
दरम्यान बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ