यवतमाळ : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी आज येथे दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक श्री. पंकजकुमार यांचे आज आगमन झाले. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे निवडणूक प्रशासनाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. तसेच विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. या बैठकिला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी, मतदान केंद्रे, मतदार संख्या, आदर्श आचारसंहिता कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, निवडणुक कर्मचारी संख्या, आदी विविध बाबींची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पदवीधर निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. यात मतदान यंत्राचा वापर न होता मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाते. मतदारांना पसंती क्रमानुसार मतपत्रिकेवर मतदान करावे लागत असल्यामुळे मतदारांनी मतदान कसे करावे याबाबत त्यांना माहिती द्यावी. तसेच मतदान केंद्र अधिकारी व चमु यांना अतिशय काळजीपुर्वक प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देशही श्री. पंकजकुमार यांनी दिले.
तत्पूर्वी नियोजित मतदान केंद्रांच्या अनुषंगाने बाभुळगाव येथिल तहसिल कार्यालयातील मतदान केंद्र, यवतमाळ शहरातील अभ्यंकर कन्या शाळा, विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय या मतदान केंद्राची निवडणूक निरीक्षक श्री. पंकज कुमार यांनी पाहणी केली.
बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगिता राठोड, सुदर्शन गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार,कार्यकारी अभियंता डी व्ही मुकडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, उपजिल्हाधिकारी बी बी बिबे, तहसिलदार कुणाल झाल्टे आदी नोडल अधिकारी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट :- सचिन झिटे यवतमाल