Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express
एका हाकेला १०९ नगरसेवक उपस्थित; अनिल चौधरींच्या नावाने जिल्ह्यात राजकीय खळबळ

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नावाभोवती मोठे राजकीय वर्तुळ तयार होताना दिसत आहे.
या बैठकीकडे सुरुवातीपासूनच संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, केवळ एका दिवसाच्या आवाहनावर तब्बल १०९ नगरसेवक उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बैठकीला चाळीसगाव, शेंदुर्णी, जामनेर, नशिराबाद, वरणगाव, यावल, फैजपूर, रावेर, बोदवड आणि भुसावळसह विविध शहरांतील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाळीसगावमधून १५, शेंदुर्णीतून ७, जामनेरमधून ४, नशिराबादमधून ८, वरणगावमधून ९, यावलमधून १५, फैजपूरमधून ९, रावेरमधून १०, बोदवडमधून ७ तर भुसावळमधून तब्बल २० नगरसेवकांनी उपस्थिती लावली.
विशेष म्हणजे, विविध पक्षांतील नगरसेवक उपस्थित असल्यामुळे या बैठकीने सर्वपक्षीय राजकीय चर्चांना आणखी वेग दिला आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक नगरसेवकांनी “अनिलभाऊ, तुम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरा… आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी भावना व्यक्त केली.
बैठकीत अनेक नगरसेवकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनिल चौधरी हे केवळ भुसावळपुरते मर्यादित नेतृत्व नसून जळगाव जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शहरात त्यांचे मित्र, कार्यकर्ते आणि समर्थक आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा करताना “जिल्ह्यातील नगरसेवकांना स्वतःचे नेतृत्व हवे आहे,” अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. काही नगरसेवकांनी “अनिल चौधरी हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खरे प्रतिनिधी ठरू शकतात,” असेही मत व्यक्त केले.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काळात आणखी मोठी बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली असून, पुढील बैठकीत ३०० पेक्षा अधिक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय बदल घडू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
बैठकीदरम्यान अनिल चौधरी यांनी उपस्थित नगरसेवकांशी संवाद साधताना, “तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी निवडणूक लढणारच… पण यासाठी सर्वांची साथ आणि आशीर्वाद महत्त्वाचा आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नगरसेवकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7