आज केंद्रीय क्रीडा आणि युवा कार्यक्रम राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी ओडीसा राज्याच्या गजपती जिल्ह्यातील स्थानिक समुदायांशी संवाद साधला आणि या क्षेत्रातील विविध विकासात्मक उपक्रमांचे मूल्यांकन केले. गजपती जिल्ह्यातील मुनि सिंगमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी रबर रोपण करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून त्यांची कार्य परिस्थिती आणि संबंधित समस्यांबद्दल माहिती घेतली. तसेच ग्राम पंचायत स्तर संघ (GPLFs) आणि स्वयं सहायता समूह (SHGs) सोबतही बैठक घेतली आणि त्यांच्या द्वारा राबविल्या जाणार्या उपक्रमांचा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानावर चर्चा केली.
तसेच गजपती जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, तरांगडाला भेट देऊन त्या परिसरातील उपलब्ध आरोग्य सेवांचे मूल्यांकन केले, विशेषत: आयुष्मान भारत यासारख्या आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी अनुकुंदागुडा येथे भेट देऊन अंगनवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मुलांच्या समग्र विकासासाठी प्रारंभिक बाल देखभाल आणि पोषणाचे महत्त्व, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) याविषयांवर विस्तृत चर्चा केली.
दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी गजपती जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम (एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम आणि एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम) यावर चर्चा केली, ज्याचा उद्देश अविकसित भागांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारातील महत्त्वाच्या अंतरांवर मात करून विकासाला गती देणे आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी स्थानिक अधिकारी वर्ग आणि नागरिकांना केलेल्या विकासात्मक प्रयत्नांची प्रशंसा करून केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांचे फायदे जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे असा विश्वास दिला.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, गजपती