Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावलच्या पाणीप्रश्नी उमेश नेमाडे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

भुसावलच्या पाणीप्रश्नी उमेश नेमाडे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील तीव्र पाणीटंचाई, नियोजनशून्य पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठा विभागाच्या कथित अनास्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहराच्या इतिहासात प्रथमच जॅकवेल परिसरात पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहिला नाही. मात्र, ही परिस्थिती निर्माण होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाने कोणतेही प्रभावी नियोजन केले नाही. त्यामुळे आज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असून पैसे देऊनही पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच प्रशासनाकडून पाणीटंचाईचे नेमके कारण, अडथळे आणि पाणीपुरवठा पूर्ववत कधी होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याबद्दलही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बंधाऱ्यात पाणी उपलब्ध झाल्यानंतरही कोणत्या भागात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी पाणीपुरवठा केला जाणार, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

काही भागांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून, पाणी शुद्धीकरण प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात पाणीटंचाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे, नियमित व पारदर्शक पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तातडीने जाहीर करणे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी देणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“भुसावळकरांनी कर भरायचा आणि पाण्यासाठी रात्रभर जागायचे, हे सहन केले जाणार नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत झाला असून प्रशासनाने आता ठोस उत्तर द्यावे,” अशी भूमिका उमेश नेमाडे यांनी निवेदनाद्वारे मांडली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; “लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा”

टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; "लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading