खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट येथे आढळले असून या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले.
या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात शन्नो या महिलेला अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या. शन्नो या महिलेला अतिशय गोपनीय पध्दतीत ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पहूर येथील हनीफ पटेल (वय ५५) याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून याच दिशेने चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.